प्रियंका गांधी राज्यसभेवर जाणार? या राज्यातून उमेदवारीची शक्यता…

Priyanka Gandhi   :  महाराष्ट्रातून राज्यसभेसाठी रिक्त होत असलेल्या सहा जागांसाठी 27 फेब्रुवारी 2024 रोजी निवडणूक होणार असून अर्ज करण्याची अंतिम तारिख 15 फेब्रुवारी 2024 आहे. निवडणूक आयोगातर्फे महाराष्ट्रासह 16 राज्यांतील राज्यसभेवर रिक्त होत असलेल्या एकूण 56 जागांसाठी निवडणूक कार्यक्रम जाहीर केला.

निवडणूक आयोगाकडून जाहीर झालेल्या जागांमध्ये आंध्र प्रदेश (3), बिहार (6), छत्तीसगड (1), गुजरात (4), हरियाणा (1), हिमाचल प्रदेश (1), कर्नाटक (4), मध्य प्रदेश (5), महाराष्ट्र (6), तेलंगणा (3), उत्तर प्रदेश (10), उत्तराखंड (1), पश्चिम बंगाल (5) ओडिशा (3) आणि राजस्थान (3) या 16 राज्यांमधील 56 जागांसाठी निवडणूक होणार आहे.

हिमाचल येथे १ जागा रिक्त आहे. या जागेसाठी काँग्रेस नेत्या प्रियांका गांधी यांचे नाव चर्चेत आहे. हिमाचल प्रदेशातील राज्यसभेच्या जागेवर होणाऱ्या निवडणुकीसाठी सत्ताधारी काँग्रेस पक्ष उमेदवाराच्या शोधात असल्याची चर्चा होती. अशातच प्रियंका गांधी यांचे नाव समोर येत आहे. येथून पक्षाच्या राष्ट्रीय सरचिटणीस प्रियांका गांधी या पक्षाच्या राज्यसभा उमेदवार होऊ शकतात, अशी चर्चा राजकीय वर्तुळात आहे.

दरम्यान, भाजप अध्यक्ष जेपी नड्डा यांचा हिमाचलमधून राज्यसभा खासदार म्हणून कार्यकाळ संपुष्टात येत आहे. राज्यात काँग्रेसचे सरकार आहे, त्यामुळे येथून काँग्रेसचा उमेदवार राज्यसभेवर जाण्याची शक्यता अधिक आहे. रिक्त जागेवर प्रियंका  गांधी यांना वरिष्ठ सभागृहात पाठवण्याचा विचार काँग्रेस नेतृत्व करत आहे.

प्रियंका गांधींशिवाय सोनिया गांधींनाही हिमाचलमधून पाठवण्याची चर्चा होती. मात्र, सोनिया गांधींना राजस्थानमधून राज्यसभेवर उभे केले जाऊ शकते. या स्थितीत प्रियंका यांना हिमाचलमधून राज्यसभेची उमेदवारी दिली जाण्याची शक्यता अधिक आहे.