बांधकाम क्षेत्रातील समस्या सोडविणार – उद्योग मंत्री उदय सामंत

पुणे – बांधकाम व्यावसायिकांनी असंघटीत कामगारांची नोंदणी करण्यासाठी पुढाकार घेण्याची आवश्‍यकता निर्माण झालेली आहे. तर, बांधकाम क्षेत्रातील समस्या सोडविण्यासाठी शासन प्रयत्न करत आहे, असे उद्योग मंत्री उदय सामंत यांनी सांगितले.

मराठी बांधकाम व्यावसायिक संघटनेच्यावतीने “पुणे शहर व परिसरात होणाऱ्या संभाव्य औद्योगिक विकास व पायाभूत सुविधांचा बांधकाम क्षेत्रावर होणारा परिणाम’ विषयावर आयोजित चर्चासत्रात सामंत बोलत होते. यावेळी खासदार श्रीरंग बारणे, मराठी बांधकाम व्यावसायिक संघटनेचे एस.आर.कुलकर्णी, नंदू घाटे, प्रमोद पाटील, अंकुश आसबे आदी उपस्थित होते. बांधकाम क्षेत्रामुळे रोजगाराच्या संधी मोठ्या प्रमाणावर निर्माण झाल्या आहेत. बांधकाम व्यावसायिक सर्वसामान्यांना घरे उपलब्ध करुन देतात.

बांधकाम क्षेत्रातील असंघटीत कामगारांनाही घरे उपलब्ध करुन देण्यासाठी संघटनेने पुढाकार घ्यावा. संघटनेने त्यांच्या क्षेत्रातील कामगारांची, महिला कामगारांची नोंदणी करावी. त्यामुळे त्यांना शासकीय योजनांचा फायदा मिळेल. मराठी माणसाने मराठी माणसाला व्यवसायामध्ये सहकार्य करावे, अशी अपेक्षा सामंत यांनी व्यक्त केली. असंघटीत क्षेत्रातील कामगारांसाठी शासनाच्या वतीने विविध कल्याणकारी योजना राबविण्यात येतात.

शासकीय योजनांचा कामगारांना लाभ मिळावा यासाठी मराठी बांधकाम व्यावसायिक संघटनेने पुढाकार घ्यावा, असे आवाहन सामंत यांनी केले आहे. खासदार श्रीरंग बारणे यांनी पुणे परिसरात मोठ्या प्रमाणावर विकासकामे होत असून याचा लाभ बांधकाम क्षेत्रातील व्यावसायिकांना होणार असल्याचे सांगितले. संघटनेचे अध्यक्ष नंदू घाटे यांनी संघटनेच्या कार्याची माहिती दिली.