परतीचा पाऊस जिल्ह्याला झोडपणार?

पुणे – शहर आणि जिल्ह्यात मागील चार महिन्यांत झालेल्या मुसळधार पावसाला “आता पुरे’ अशी म्हणण्याची वेळ आली आहे. परंतु, आता खरी पावसाची “ट्‌वेंटी ट्‌वेंटी मॅच’ सुरू झाली असून, दोन दिवसांपूर्वी झालेल्या पावसामुळे यंदा परतीचा पाऊस शहरासह जिल्ह्याला झोडपणार असे दिसते. दरम्यान, पुढील 24 तासांत उत्तर मध्य महाराष्ट्र वादळी वाऱ्यासह पाऊस पडण्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे.

जिल्ह्यात पश्‍चिम पट्ट्यातील भोर, वेल्हा, मुळशी, मावळ, जुन्नर आणि खेड तालुक्‍यांमध्ये मुसळधार, तर पूर्व पट्ट्यातील बारामती, इंदापूर, पुरंदर, शिरूर, दौंड या तालुक्‍यात पाऊसच नाही. त्यामुळे खरीप हंगाम तर गेला, त्याचबरोबर पाण्यासाठी होणारी पायपीटही कमी झाली नाही.

सप्टेंबरअखेर दुष्काळी पट्ट्यात पावसाने समाधानकारक हजेरी लावली. गतवर्षी परतीच्या पावसाने हुलकावणी दिली होती. मात्र, यावर्षी परतीचा पहिलाच पाऊस मुसळधार पडला. काही ठिकाणी वादळी आणि गारांचा पाऊस झाल्यामुळे झाडपडीच्या घटना घडल्या.

शेतीचे नुकसान झाले. मात्र, पुन्हा दोन दिवस कडक ऊन आणि ढगाळ वातावरण आहे. गेल्या 24 तासांत वेल्हा, भोर, इंदापूर याठिकाणी प्रत्येकी 5 मिमी पावसाची नोंद झाली. बारामतीमध्ये 3 तर दौंड येथे 2 मिमी पाऊस झाला. जिल्ह्यात पुढील 48 तासांत जोरदार पाऊस पडण्याची शक्‍यता आहे. नागरिकांनी वादळी वाऱ्यासह पाऊस सुरू झाल्यावर पावसात जाऊ नये. सुरक्षित ठिकाणी थांबावे, असे आवाहन जिल्हा प्रशासनाने केले आहे.

Leave a Comment