श्रीदेवी यांच्या आयुष्यावर आधारित सिनेमा येणार का? बोनी कपूर म्हणाले…

Bollywood : बॉलिवूडची दिवंगत अभिनेत्री श्रीदेवी (Sridevi) यांनी आपल्या अभिनयाने आणि सौंदर्याने प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवले आहे. 2018 साली त्यांचे दुर्दैवी निधन झाले. त्यांच्या जाण्याने बॉलिवूड सिनेसृष्टीमध्ये पोकळी निर्माण झाली. बॉलिवूडची चाँदनी म्हणून ओळख असणाऱ्या श्रीदेवी यांच्यावर बायोपिक येणार असल्याची चर्चा मागील काही दिवसांपासून सुरू आहे. मात्र श्रीदेवी यांचे पती बोनी कपूर यांनी श्रीदेवी यांच्या बायोपिकबाबत मोठा निर्णय घेतला आहे.

श्रीदेवी यांच्यावर कधीही बायोपिक बनवणार नसल्याचे त्यांनी सांगितले आहे. ते म्हणाले की, ‘मी तिच्यावर कधीही बायोपिक बनवणार नाही. तिच्या जीवनावर चित्रपट बनवण्याच्या अनेक ऑफर मला आल्या, पण मी त्यासाठी तयार नाही. ही माझ्यासाठी अत्यंत वैयक्तिक बाब आहे, श्रीदेवीच्या आयुष्यावर किंवा तिच्याबद्दल काही जण पुस्तक लिहित आहेत. तिच्या आयुष्यावर पुस्तक लिहिण्याची देखील माझी इच्छा नाही.”

बोनी कपूर पुढे म्हणाले, “श्रीदेवी आणि माझी लव्हस्टोरी ही आमची वैयक्तिक बाब आहे. श्री ही कायमच माझ्या जवळ असणार आहे. आम्ही कसे एकमेकांच्या प्रेमात पडलो आणि संसार थाटला ही आमची वैयक्तिक बाब आहे. यावर एखादी कलाकृती होऊ नये”. बोनी कपूर यांच्या या वक्तव्यामुळे चाहते नाराज झाले आहेत.

दरम्यान, श्रीदेवी यांनी ‘हिम्मतवाला’ या सिनेमाच्या माध्यमातून त्यांनी बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं. श्रीदेवी यांनी अनेक सुपरहिट सिनेमे दिले आहेत. हिंदीसह तामिळ, तेलगू, मल्याळम आणि कन्नड सिनेमांतही अभिनेत्रीने काम केलं. भारत सरकारतर्फे त्यांना पद्मश्री पुरस्काराने गौरवण्यात आले.