“वाइनशॉप, ढाबाचालकांनो खबरदार” ; विनापरवानगी मद्यपान करू दिल्यास दंडासह होईल तुरुंगवास

उत्पादन शुल्ककडून आठ महिन्यांत 497 जणांना अटक
वालचंदनगर –
पुणे जिल्ह्यात शहरी व ग्रामीण भागात बिअर शॉपी, वाइनशॉप यांसह काही ढाबाचालक व हॉटेलचालक परवानगी नसतानाही दारू पिण्याची परवानगी देताय तर खबरदार! असा प्रकार आढळून आल्यास राज्य उत्पादन शुल्क विभागातर्फे (एक्‍साइज) दारू पिणाऱ्यांसह ढाबाचालकांवरही 50 हजारांपर्यंत दंड आणि 5 वर्षांची शिक्षा होऊ शकते. खात्याने 8 महिन्यांत विविध कारवायांमध्ये आत्तापर्यंत 497 जणांवर अटकेची कारवाई केली आहे.

जिल्ह्यातील ग्रामीण भागात मोठ्या प्रमाणावर हॉटेलिंग व मांसाहारी ढाब्यांची संख्या वाढत आहे. उत्पादन शुल्क खात्याचे अधीक्षक चरणसिंग राजपूत आल्यापासून कारवाईचा धडाका सुरू केला आहे. उत्पादन शुल्कचे अधिकारी सध्या ऍक्‍शन मोडवर आले आहेत.

बिअर शॉपी, वाइन शॉपीसह हॉटेल व ढाबामालकांकडून नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी उत्पादन शुल्क विभागाने धडक कारवाई करून अशा हॉटेल/ ढाबा चालक व अन्य 383 ठिकाणांवर आत्तापर्यंत कारवाई केली. 31 लाख 63 हजारांचा मुद्देमाल जप्त करत 497 आरोपींवर कारवाई केली असून 7 वाहने जप्त केली आहे.

राज्य उत्पादन शुल्क विभागाकडून नेहमीच ढाव्यांवर पाहणी होते. एक्‍साइजच्या विविध पथकाकडून जिल्ह्यात ग्रामीण कारवाया होत आहेत, नियमांचे उल्लंघन करणाऱ्या हॉटेल व ढाबाचालकांवर कारवाई सुरच राहणार आहे.
-चरणजितसिंग राजपूत, अधीक्षक राज्य उत्पादन शुल्क विभाग, पुणे