उदयनराजेंचा नाव न घेता शिवेंद्रसिंहराजेंना टोला,’तुमच्यावर प्रेम असेल तर लोक तुमचेही पेंटिंग काढतील’

सातारा  – माझ्यावर प्रेम करणारे लोक भरपूर आहेत. त्यातील काहींनी माझे पेंटिंग काढण्याची इच्छा व्यक्त केली. बघू त्यांच्या इच्छेचे. तुमच्यावर प्रेम असेल, तर लोक तुमचेही पेंटिंग लावतील, असा टोला खा. उदयनराजेंनी आ. शिवेंद्रसिंहराजेंचे नाव न घेता लगावला. दरम्यान, तुमच्या हातात 35 वर्ष सत्ता होती, तेव्हा काय केले, असा प्रश्‍नही त्यांनी केला.

जनतेच्या समस्यांसंदर्भात जिल्हाधिकारी रुचेश जयवंशी यांना निवेदन दिल्यानंतर, पत्रकारांशी बोलताना उदयनराजे म्हणाले, धरणग्रस्तांच्या मुद्‌द्‌यावर जिल्हाधिकारी रुचेश जयवंशी यांच्याशी सकारात्मक चर्चा झाली. यासंदर्भात जिल्हाधिकारी बैठक घेणार आहेत. उरमोडी धरणग्रस्तांचा प्रश्‍न 15 वर्षे सुटलेला नाही. पीओपीवर बंदी आहे. पीओपी पर्यावरणाला हानिकारक आहे. मातीच्या मूर्ती पाण्यात विरघळतात. शासनाच्या आदेशांची अंमलबजावणी करण्याची ग्वाही त्यांनी दिली आहे. 15 वर्षांपेक्षा जुन्या गाड्या स्क्रॅप करण्याच्या शासनाच्या निर्णयासंदर्भात वडाप चालक-मालक संघटनेच्या मागण्यांबाबत चर्चा झाली. जुन्या गाड्या स्क्रॅप करायचा निर्णय घेतला असेल, तरी त्यांची मागणी एवढीच आहे की, शोरुममध्ये गाड्याच उपलब्ध नाहीत. तोपर्यत वेळ देण्यात यावा. याबाबत उपमुख्यमंत्री आणि परिवहन मंत्र्यांशी मी चर्चा करणार आहे.

पोवई नाक्‍यावरील पेंटिंगबाबत झालेल्या वादावर म्हणाले, कोण काय बोलतंय, हे मी वर्तमानपत्रांमध्ये वाचले, तेव्हा वाद झाल्याचे मला समजले. वाद वगैरे झालेला नाही. शंभूराज देसाई पालकमंत्री आहेत. आमचे लोक त्यांच्याशी चर्चा करायला गेले होते. सिक्‍युरिटीबाबत त्यांना विचारले. माझ्यावर भरपूर प्रेम असलेले काही लोक आहेत. त्यांनी पेंटिंग लावण्याची इच्छाच व्यक्‍त केली. माझा स्वभाव स्तुतीप्रिय नाही. लोकांचे प्रेम आहे, म्हणून माझे पेंटिंग लावतात, त्याला मी काय करणार? लोकांची सेवा करणे, हे माझे कर्तव्य आहे.

ते मी पार पाडत आहे. लोकांना त्यांच्याबद्दल प्रेम वाटेल, तेव्हा लोक त्यांचेही पेंटिंग लावतील. आम्ही आमचे काम करतो, श्रेयवादात पडत नाही. काम कोणी केले, हे सांगायची गरज नाही. त्यांच्याकडे सगळी सत्ता, म्हणजे आमदारकी, पालकमंत्रिपद, नगरपालिका, जिल्हा परिषद, पंचायत समिती, जिल्हा बॅंक, असे सगळे असताना, 30-35 वर्षांत काय झाले? लोकांनी मला निवडून दिले. माझ्या हातून कामे झाली. याच्या अगोदर काम का झाले नाही?

तिथं ठरलं, उद्या इथंही ठरेल
नागालॅंडमधील राजकीय समीकरणबाबत विचारले असता, उदयनराजे म्हणाले, त्या बैठकीला मी नव्हतो. त्यामुळे नेमके काय घडले, त्यावर मी भाष्य करू शकणार नाही. काय ठरतंय माहिती नाही. “वेट अँड वॉच’ करुयात. तिथं ठरलं, उद्या इथंही ठरेल. मेहरबानी करुन पक्षाच्या बाबतीत विचारू नका.