राज्यात नसबंदीमध्ये महिलाच पुढे ! यंदा 23 टक्के महिलांची, तर केवळ दोन टक्के पुरुषांची शस्त्रक्रिया

 

पुणे, दि. 19 -राज्यात गेल्या पाच वर्षांमध्ये नसबंदीचे प्रमाण घटले असले तरी ज्या नसबंदी झाल्या आहेत, त्यात पुरुषांपेक्षा महिलांचीच संख्या जास्त आहे. नसबंदीची आकडेवारी पाहिल्यास पुरुषप्रधान संस्कृतीचा पगडा अजूनही असल्याचे दिसून येते.

यावर्षी जानेवारी ते ऑगस्ट या कालावधीत महिलांच्या नसबंदीचे प्रमाण 23 टक्के, तर पुरुषांच्या नसबंदीचे प्रमाण केवळ 2 टक्के इतके आहे. ही आकडेवारी पाहता पुरुषांमध्ये नसबंदीविषयक जागरुकता नाही, असे जरी म्हटले जात असले तरी ती अजूनही समाजात मानसिकता नाही, असे म्हणणे जास्त संयुक्तिक ठरणारे आहे.

गेल्या दोन वर्षांमध्ये करोनाच्या प्रादुर्भावामुळे नसबंदी शस्त्रक्रिया कमी झाल्या. त्यानंतर 2021-22 पासून पुन्हा प्रमाण वाढले. पुरुष आणि महिलांचे प्रबोधन, नसबंदी शस्त्रक्रियांची मोफत शिबिरे अशा विविध उपक्रमांच्या माध्यमातून नसबंदीबाबत जनजागृती करण्याचे काम पूर्वीपासूनच राज्य सरकारच्या आरोग्य विभागाकडून केले जाते.

राज्यात सन 2017-18 यावर्षी महिला नसबंदीच्या एकूण उद्दिष्टापैकी 80 टक्के उद्दिष्ट पूर्ण झाले. हेच प्रमाण सन 2018-19 मध्ये 76 टक्के, सन 2019-20 मध्ये 70 टक्के होते. करोनाच्या प्रादूर्भावामुळे 2020-21 यावर्षी नसबंदीचे प्रमाण 40 टक्‍क्‍यांपर्यंत खाली आले. करोनाचा प्रादुर्भाव कमी झाल्यावर सन 2021-22 मध्ये नसबंदीचे प्रमाण वाढून 53 टक्के झाले. यावर्षी जानेवारी ते ऑगस्ट या कालावधीत 23 टक्के उद्दिष्ट पूर्ण झाले आहे.

महिलांच्या तुलनेत पुरुषांमध्ये नसबंदीचे प्रमाण कायमच कमी दिसते. पुरुषांच्या नसबंदीचे प्रमाण सन 2017-18 मध्ये 23 टक्के, सन 2018-19 मध्ये 17 टक्के, सन 2019-20 मध्ये 18 टक्के, सन 2020-21 मध्ये 11 टक्के, सन 2021-22 मध्ये 15 टक्के तर यावर्षी पहिल्या नऊ महिन्यांमध्ये केवळ 2 टक्के आहे.