Video : महाबळेश्वरमध्ये शोभायात्रा काढत ‘महिला दिन’ उत्साहात साजरा

पाचगणी (प्रतिनिधी)- महाबळेश्वरमध्ये महिलांनी मोठी शोभायात्रा काढून जागतिक महिला दिन आनंदाने व उत्साहाने साजरा केला . महाबळेश्वर नगरपालिकेच्या प्रशासक व मुख्याधिकारी पल्लवी पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित शोभायात्रेत शहरातील मुन्नवर हौसिंग सोसायटी, गणेश नगर हौसिंग सोसायटी,गवळी मोहल्ला, रामगड, कोळी आळी, माळी आळी, मुख्य बाजारपेठ, रांजणवाडी यांच्यासह शहरातील सर्व महिलांनी भगवे फेटे परिधान करून सहभाग घेतला.

यावेळी शहरातील मुख्य बाजारेठेतून स्त्री शक्तीचा जागर करत दिलेल्या घोषणांनी आसमंत दुमदुमून गेला. यावेळी शहरातील विविध विभागांतील महिलांनी उभारलेले चित्ररथ व नयनरम्य देखाव्यांनी महाबळेश्वर शहराला आनंद दिला. छत्रपती शिवरायांच्या जन्मोत्सवाचा चित्ररथ आणि ‘जय भवानी जय शिवाजी’ घोषणेने महाबळेश्वर शहरातील पर्यटक भारावून गेले. पुरोगामी महाराष्ट्राच्या वारकरी संप्रदाय संस्कृतीच्या ‘तुकोबा ज्ञानोबा’ घोषणेने परिसर मंत्रमुग्ध झाला.

मुख्याधिकारी पल्लवी पाटील यांच्या अध्यक्षतेखाली महिला दिनानिमित्त महिलांची भव्य रॅली, शहरातील महिलांचा सांस्कृतिक कार्यक्रम, मिस महाबळेश्वर व मिसेस महाबळेश्वर, हास्याचा बूस्टर डोस कार्यक्रम तसेच मोफत आरोग्य तपासणी व शस्त्रक्रिया शिबिर असे अनेक कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहे.