तब्बल सात दिवस इंदापूर तहसीलचे काम बंद; नागरिकांची प्रचंड गैरसोय

इंदापूर – इंदापूर तालुक्याचे तहसीलदार श्रीकांत पाटील व त्यांच्या शासकीय वाहनावरील चालक यांच्यावर शुक्रवार (ता.24 मे)रोजी सकाळी गौण खनिज उत्खननावर कारवाई केल्याचा राग मनात धरून हल्ला करण्यात आला होता. या घटनेनंतर इंदापूर पोलिसांनी पाच जणांसह इतर आरोपी यांचेवर गुन्हा दाखल करीत यांधील तीन आरोपींना अटक ही करण्यात यश मिळवलेले होते. मात्र मुख्य आरोपी अद्यापही फरार असल्याने इंदापूर येथील महसूल कर्मचाऱ्यांच्या वतीने हल्ला झालेल्या घटनेपासून बेमुदत काम बंद आंदोलन तब्बल सात दिवसांपासून सुरूच आहे.

त्यामुळे तालुक्यातील शेकडो नागरिक, दिव्यांग तसेच शाळकरी विद्यार्थी यांची महत्त्वाची कामे रखडलेली आहेत. रोज
इंदापूर तहसीलदार कार्यालयाला हेलपाटे मारून, नागरिक संतापले आहेत, तालुक्यातील बेमुदत काम बंद आंदोलनावर तोडगा कोण काढणार ? असा सवाल नागरिक करत आहेत.

सदर घटनेचे इंदापूर पोलिसांना गांभीर्य नसून या प्रकरणाचा तपास गुन्हे अन्वेषण विभागाकडे देण्याची मागणी निवेदनाद्वारे कर्मचाऱ्यांनी केली आहे. काम बंद आंदोलनामुळे, नागरिकांची अडचण निकाली काढण्याची, वरिष्ठ अधिकारी का तसदी घेत नाहीत याचे कोडे न उलगडणारे आहे.

खरे तर इंदापूर तहसीलदारांवर जो हल्ला झाला तो निंदनीय आहे. विविध सामाजिक संघटना राजकीय नेते सामाजिक कार्यकर्ते यांनी या घटनेचा तीव्र शब्दात निषेध केला. मुख्य आरोपी का सापडत नाहीत. याचे कारण पुढे आलेले दिसत नाही. कर्मचारी संघटनेने हा विषय लावून धरलाच पाहिजे, मात्र तालुक्यातील सामान्य नागरिकांची या प्रकरणाशी, या हल्ल्याशी काय संबंध, त्यांची नित्याची कामे झाली नाही तर त्यांना किती त्रास होतो. किती वेदना होतात. झोपडीतल्याच माणसाला माहिती आहे. याचा विचार शासनाने करावा, लवकर तोडगा काढून काम सुरु करण्यात यावे अशी मागणी केली जात आहे.