पुणे- मुंबई द्रुतगती मार्गावर मिसिंग लिंकचे काम गतीने सुरू

पुणे – पुणे- मुंबई द्रुतगती मार्गावरील खोपोली एक्झिट ते कुसगाव या भागात उभारण्यात येत असलेल्या पर्यायी रस्ताच्या दोन बोगदे व दोन व्हाया डक्टसह आठ पदरी नवीन रस्ता बांधण्याच्या कामाने वेग घेतला आहे. यामध्ये 9 किलोमीटर लांबीचा बोगदा असणार आहे. आतापर्यंत दोन किलोमीटर लांबीचे बोगदे खोदाईचे काम पूर्ण झाले आहे. हा प्रकल्प पूर्ण झाल्यानंतर पुणे- मुंबई हे अंतर सहा किलोमीटरने कमी होणार आहे.

 

 

मुंबई पुणे द्रुतगती मार्ग व मुंबई पुणे राष्ट्रीय महामार्ग क्रमांक चार हे दोन्ही कॉरीडॉर सुधारणा तथा देखभाल, दुरुस्तीसाठी “बांधा, वापरा व हस्तांतरित करा’ (बीओटी) तत्वावर 30 वर्षांसाठी शासनाने राज्य रस्ते विकास महामंडळाकडे (एमएसआरडीसी) हस्तांतरित केले आहे. या मार्गावरील वाहतूक कोंडी फोडण्याबरोबरच दोन्ही शहरातील अंतर कमी करण्यासाठी हा प्रकल्प महामंडळाने हाती घेतला आहे.

 

 

मुंबई पुणे द्रुतगती मार्ग व मुंबई पुणे राष्ट्रीय महामार्ग क्रमांक चार हे खालापूर टोल प्लाझाजवळ एकत्र येऊन मिळतात. तर पुढे खंडाळा एक्झिट येथे वेगळे होतात. आडोशी बोगदा ते खंडाळा एक्झिट हा रस्ता सहा पदरी असून या भागात 10 पदरी वाहतूक येऊन मिळते. तसेच या भागामध्ये घाट व चढ-उताराचे प्रमाण जास्त असून पावसाळ्यात दरडी कोसळण्याचे प्रकार वारंवार होत असतात.

 

 

त्यामुळे मुंबईकडे येणारी डोंगरालगतची एक लेन पावसाळ्यात बंद ठेवावी लागते. या पार्श्वभूमीवर 13.3 किलोमीटरच्या राहिलेल्या मिसींग लिंकचे काम एमएसआरडीने हाती घेतले आहे. या प्रकल्पामुळे बोर घाटातील 6 किमी वळणाच्या मार्गाला हा पर्यायी मार्ग उपलब्ध होणार आहे.

Leave a Comment