लसीकरणाच्या बूस्टर डोसबाबत जगभर संशोधन

पुणे- करोना प्रतिबंधक लसीकरण मोहिमेच्या वर्षपूर्तीनंतर नागरिकांत निर्माण झालेल्या अँटिबॉडीजचा अभ्यास करून बूस्टर डोस द्यावा किंवा नाही, याचा अभ्यास करावा लागणार आहे. भारतातच नव्हे, तर संपूर्ण जगातच याबाबत संशोधन आणि अभ्यास सुरू झाला आहे.

भारतातील लसीकरण मोहिमेला तीन महिन्यानंतर वर्ष पूर्ण होईल. परंतु मोहीम सुरू झाल्यानंतर पहिल्या लाभार्थीपासूनचा अभ्यास करावा लागणार आहे. त्यामध्ये अँटिबॉडीज वाढल्या का, किती वाढल्या, दुसऱ्या डोसनंतर किती वाढल्या आणि वर्षभरात त्या कमी झाल्या की तेवढ्याच राहिल्या या सगळ्याचा अभ्यास करावा लागणार आहे, असे मत राज्याचे साथरोग विभागप्रमुख आणि आरोग्य उपसंचालक डॉ. प्रदीप आवटे यांनी व्यक्त केले.

या लसीच्या “रिझल्ट’बाबतचे संशोधन लवकरच बाहेर येऊ शकेल. त्यानंतरच “बूस्टर’ डोस बाबतचा विचार भारतासह सर्व देश करतील. परंतु यामध्ये आधी भारतातील सर्व नागरिकांचे लसीकरण होणेही आवश्‍यक आहे. यातूनच पुढच्या लसीकरणाचे नियोजन करता येणार आहे. पहिल्या दिलेल्या डोसच्या परिणामांवर हे सगळे अवलंबून असणार आहे. त्यामुळे तीन महिन्यानंतरच्या संशोधनातून ही माहिती उपलब्ध होऊ शकते, असे मत राज्याचे लसीकरण मोहिमेचे प्रमुख
डॉ. दिलीप पाटील यांनी व्यक्त केले.

जेवढ्या प्रमाणात लसीकरण झाले आहे, त्यानुसार जास्तीत जास्त प्रयुक्तांचा या संशोधनात समावेश असणे आवश्‍यक आहे, तरच याचे निष्कर्ष योग्य आणि चोख येऊ शकतात. हे प्रयुक्त काही हजारांमध्ये किंवा लाखांमध्ये असतील तर निष्कर्ष अधिक निर्दोष पद्धतीने येऊ शकतात. त्यानंतरच बूस्टर डोसबाबतचा निर्णय घेता येऊ शकतो.
– डॉ. संजीव वावरे,
सह आरोग्यप्रमुख, मनपा