Pune: तृतीयपंथी विद्यार्थ्यांचे शैक्षणिक शुल्‍क माफ; पुणे विद्यापीठाचा निर्णय

पुणे – सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ आणि संलग्न सर्व महाविद्यालये आणि मान्यताप्राप्त उच्च शिक्षण संस्थांमध्ये तृतीयपंथी विद्यार्थ्यांचे शैक्षणिक शुल्क माफ करण्याचा निर्णय विद्यापीठाने घेतला आहे. त्‍याची अंमलबजावणी यंदाच्‍या शैक्षणिक वर्षापासून होणार आहे.

याबाबतचे परिपत्रक विद्यापीठाच्‍या शैक्षणिक प्रवेश विभागाने मंगळवारी काढले. तृतीयपंथी विद्यार्थ्यांचा शैक्षणिक टक्का वाढवा, हा या निर्णयामागचा मुख्य उद्देश आहे. उच्च व तंत्रशिक्षण विभागाकडून गेल्या वर्षी डिसेंबर २०२३ मध्ये याबाबत शासन निर्णय प्रसिद्ध केला होता.

त्यानुसार विद्यापीठ अधिकार मंडळाने आगामी शैक्षणिक वर्षापासून या निर्णयाची अंमलबजावणी करण्याचा निर्णय घेतला आहे. राज्यातील तृतीयपंथी विद्यार्थ्यांचे सर्व अभ्यासक्रमाचे शैक्षणिक शुल्क उच्च व तंत्रशिक्षण विभागाच्या अधिपत्याखाली माफ करण्यात येणार आहे. विद्यापीठ संलग्न महाविद्यालयांमध्ये प्रवेश घेतलेल्या तृतीयपंथी विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक शुल्काची प्रतिपूर्ती विद्यापीठ निधीतून करण्यात येणार आहे.

विद्यापीठाशी संलग्न महाविद्यालये, उच्च शिक्षण संस्थांचे प्राचार्य, संचालक आणि परीक्षा विभागप्रमुखांना या निर्णयाची अंमलबजावणी करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. पुणे शहरात तृतीयपंथी विद्यार्थ्यांचे प्रमाण मोठ्या प्रमाणावर आहे. या निर्णयामुळे या सर्व विद्यार्थ्यांना शैक्षणिक फायदा होणार असून, यामुळे त्यांच्या शिक्षणाची टक्केवारी वाढण्यास मदत होणार आहे.