‘द व्हॅक्सिन वॉर’मध्ये ‘या’ अभिनेत्रीची एंट्री; विवेक अग्निहोत्रींनी व्हिडीओ शेअर करत दिली माहिती

मुंबई – दिग्दर्शक विवेक रंजन अग्निहोत्री यांच्या ‘द काश्मीर फाइल्स’ या चित्रपटाला मोठी पसंती मिळाली. बॉक्स ऑफिसवर या चित्रपटाने तुफान कमाई केली आहे. काही दिवसांपूर्वीच विवेक अग्निहोत्री यांनी ‘द व्हॅक्सिन वॉर’ चित्रपटाची घोषणा केली होती. तेव्हापासून अनेकजण या चित्रपटाची आतुरतेने वाट पाहात आहे. नुकतेच या चित्रपटाबाबत एक मोठी अपडेट समोर आली आहे.

या चित्रपटात नाना पाटेकर महत्त्वपूर्ण भूमिकेत दिसणार आहेत. मात्र अभिनेत्री म्हणून कोणाला संधी देण्यात आली. हे अद्याप उघड झाले नव्हते. अखेर विवेक अग्निहोत्री यांनी एक व्हिडीओ शेअर करत या चित्रपटात कोणती अभिनेत्री काम करताना दिसणार, याची घोषणा केली आहे. अभिनेत्री रायमा सेन या चित्रपटामध्ये महत्त्वपूर्ण भूमिकेत दिसणार आहे. हे आता स्पष्ट झाले आहे.

काही दिवसांपूर्वी विवेक अग्निहोत्री कोलकाता येथे गेले होते. तिथे त्यांनी रायमाचं काम पाहिलं आणि त्यांना ते खूप आवडले. त्यामुळे त्यांनी तिला या आगामी चित्रपटामध्ये कास्ट केले असून तिने शूटींगलाही सुरुवात केली आहे. भारतात बनवण्यात आलेल्या कोरोना लसीवर आधारित हा चित्रपट आहे. ही लस खूप प्रभावी ठरली. इतर देशांच्या तुलनेने नागरिकांवर कोरोनाचा परिणाम झाला नाही. मात्र चीन, ब्रिटन आणि इतर अनेक देश कोरोनाशी झुंज देत होते.

विवेक रंजन अग्निहोत्री यांचा ‘द व्हॅक्सिन वॉर’हा चित्रपट 15 ऑगस्ट 2023 रोजी हिंदी, इंग्रजी, बंगाली, पंजाबी, भोजपुरी, कन्नड, तमिळ, तेलगू, मल्याळम, गुजराती आणि मराठी अशा 11 भाषेत प्रदर्शित होणार आहे. ‘द व्हॅक्सिन वॉर’पूर्वी विवेक यांचा ‘द काश्मीर फाइल्स’ हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर ब्लॉकबस्टर ठरला. कमी बजेटमध्ये बनलेल्या या चित्रपटाने कमाईचे अनेक विक्रम करत 252.90 कोटी कमावले.