येडियुरप्पांचा पक्षश्रेष्ठींना सूचक इशारा; नाकारला कॅबिनेट दर्जा

बंगलुरू – कर्नाटकचे माजी मुख्यमंत्री बी. एस. येडियुरप्पा यांना खूष ठेवण्यासाठी तेथील भाजप सरकारने त्यांना कॅबिनेटचा दर्जा जाहीर केला होता, पण येडियुरप्पा यांनी हा दर्जा नाकारला आहे. त्यांनी तसे पत्र मुख्यमंत्री बोम्माई यांना पाठवले आहे.

त्यात त्यांनी म्हटले आहे की, माजी मुख्यमंत्र्यांना ज्या सवलती दिल्या जातात तेवढ्याच सवलती आपल्याला देण्यात याव्यात आणि आपल्याला देण्यात आलेला कॅबिनेट मंत्रिपदाचा दर्जा काढून घेण्यात यावा. मुख्यमंत्री बोम्माई यांनी कालच येडियुरप्पांना कॅबिनेट मंत्रिपदाचा दर्जा देण्याचा आदेश जारी केला होता.

26 जुलै रोजी वयाच्या कारणावरून येडियुरप्पा यांना मुख्यमंत्रिपदावरून राजीनामा द्यावा लागला आहे. त्यामुळे नाराज असलेल्या येडियुरप्पांना खूष ठेवण्यासाठी हा दर्जा दिला गेला असताना त्यांनी तो नाकारून पक्षश्रेष्ठींना योग्य तो संदेश दिला आहे असा अन्वयार्थ यातून काढण्यात येत आहे.