मुंबई, पुण्याला ‘येलो अलर्ट’ जारी ! सर्वसामान्यांसाठी हवामान विभागाने दिल्या महत्वाच्या सूचना

मुंबई – महाराष्ट्रात ऐन गणेशोत्सवात (Ganeshotsav 2023) मान्सून सक्रिय झाल्याचे पाहायला मिळते आहे. सिक्कीम ते मध्य महाराष्ट्र या भागामध्ये कमी दाबाचा पट्टा तीव्र झाल्यामुळे राज्यात गेल्या 24 तासात बहुतांश भागात मुसळधार पावसाने हजेरी लावली. दरम्यान, येत्या बुधवारपर्यंत संपूर्ण राज्यामध्ये हवामान विभागाने “येलो अलर्ट’ (yellow alert) जारी केला आहे. त्यामुळे नागरिकांनी पुढील दोन दिवस घराबाहेर पडताना हवामानाचा अंदाज घ्यावा अशा सूचना हवामान विभागाकडून देण्यात आल्या आहेत.

राज्यात अनेक जिल्ह्यांना येलो अलर्ट असून विदर्भात पावसाचा जोर जास्त असणार असल्याची माहिती हवामान खात्याकडून देण्यात आली आहे. यामुळे पुढच्या 24 तासांमध्ये मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस पडेल. तर 27 सप्टेंबरपर्यंत फक्त विदर्भात पावसाचा जोर असेल, अशी शक्‍यता हवामान खात्याकडून वर्तवण्यात आली आहे. (Rain update)

हवामान खात्यानुसार, विदर्भातील यवतमाळ, वाशिम, वर्धा, नागपूर, गोंदिया, गडचिरोली, चंद्रपूर, भंडारा, अमरावती, अकोला, मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगर, जालना, परभणी, बीड तर मध्य महाराष्ट्रात पुणे, सातारा, सोलापूर, उत्तर महाराष्ट्र, नाशिक, जळगाव, कोकण, रत्नागिरी, रायगड, ठाणे, या जिल्ह्यांना 27 सप्टेंबरपर्यंत येलो अलर्ट जारी करण्यात आला आहे.