तरुण पिढीच्या चवीची कंपनी “वेस्टलाइफ डेव्हलपमेंट”

मॅकडोनाल्ड्‌स आणि तरुण पिढीचे नाते एव्हाना सगळ्यांना माहिती आहे. तरुण पिढीच नव्हे तर सर्वच वयोगटातील नागरिकांना मॅकडोनाल्ड्‌सचे स्पाईसी चिकन बर्गर, टिक्की बर्गर, चीज सुप्रीम, चिकन कबाब बर्गर आणि विविध प्रकारची कॉम्बिनेशनमधली मील्स आणि बीव्हरेजेस नेहमीच खुणावत असतात.

अशा या मॅकडोनाल्ड्‌सची देशाच्या दक्षिण आणि पश्‍चिमेकडील राज्यांमधील सर्व रेस्टॉरंटसची फ्रॅंचायझी वेस्टलाईफ डेव्हलपमेंट लिमिटेड या कंपनीकडे आहे. 1982 मध्ये स्थापन झालेली ही मिडकॅप वर्गातील कंपनी आहे.

क्‍यूएसआर म्हणजेच क्विक सर्व्हिस रेस्टॉरंटच्या क्षेत्रात काम करणारी ही कंपनी आहे. वेस्टलाईफ डेव्हलपमेंट लिमिटेड मुंबईत मुख्यालय असलेल्या बी. एल. जतिया समूहातील हार्ड कॅसल रेस्टॉरंट्‌स प्रा. लिमिटेड या कंपनीची पूर्ण मालकी असलेली उपकंपनी आहे.
31 मार्च 2022 च्या नोंदीनुसार कंपनीचा 56.98 टक्के हिस्सा प्रवर्तकांकडे आहे. सप्टेंबर 2021 मध्ये प्रवर्तकांकडे कंपनीचा 57.13 टक्के हिस्सा होता. त्यात काही प्रमाणात घट झाल्याचे दिसत आहे.

प्रवर्तकांकडील एकही शेअर गहाण ठेवण्यात आलेला नाही ही जमेची बाजू आहे. परकीय गुंतवणूक संस्थांकडे कंपनीचे 9.94 टक्के शेअर तर देशातील गुंतवणूक संस्था आणि म्युच्युअल फंडांकडे 22.84 टक्के शेअर आहेत. अन्य व्यक्ती व संस्थांकडे 10.24 टक्के शेअर आहेत. एसबीआय इक्विटी हायब्रिड या म्युच्युअल फंड योजनेने या कंपनीच्या शेअर्समध्ये त्यांच्याकडे व्यवस्थापनासाठी असलेल्या रकमेपैकी 0.68 टक्के रक्कम गुंतवलेली आहे. त्याचबरोबर एसबीआय मॅग्नम ग्लोबल, डीएसपी स्मॉल कॅप, मिराई असेट ग्रेट कन्झ्युमर, फ्रॅंकलिन इंडिया स्मॉलर कंपनीज या योजनांची देखील कंपनीत गुंतवणूक असल्याचे दिसत आहे.

31 मार्च 2022 रोजी संपलेल्या तिमाहीमध्ये कंपनीला 15.32 कोटी रुपये एवढा निव्वळ नफा झालेला आहे. गेल्यावर्षी जानेवारी ते मार्च या तिमाहीतील निव्वळ नफा 6.03 कोटी रुपये एवढा होता. सेम-स्टोअर सेल्स ग्रोथ म्हणजेच कंपनीच्या एसएसजीमध्ये गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा 23 टक्‍क्‍यांनी वाढ झालेली आहे. 2022 च्या शेवटच्या तिमाहीत कंपनीने 12 नवीन मॅकडोनल्ड्‌स रेस्टॉरंट उघडली. आता कंपनीची एकूण 47 शहरांमध्ये 326 रेस्टॉरंट्‌स आणि 262 मॅककॅफे आहेत. 2021-22 या वर्षात कंपनीच्या विक्रीत गेल्यावर्षीच्या तुलनेत 59.55 टक्‍क्‍यांनी वाढ झाल्याचे दिसून येते. गेल्यावर्षी कंपनीची विक्री 975.25 कोटी रुपये होती. ती 2021-22 या वर्षात 1556.08 कोटी रुपयांवर पोचली आहे.

कंपनीचे व्यवस्थापन जोरकस आणि आक्रमकपणे काम करत असल्याने त्यांनी दरवर्षी 50 नवीन रेस्टॉरंट्‌स उघडण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे. दरवर्षी साधारणपणे 25 ते 30 नवी रेस्टॉरंटची भर पडत असते. आता वर्षाला 50 पर्यंत उद्दिष्ट ठेवल्याने येत्या तीन ते पाच वर्षांच्या कालावधीत क्वीक सर्व्हिस रेस्टॉरंट म्हणजेच क्‍यूएसआर क्षेत्रात कंपनीचे मूल्यांकन वेगाने वाढण्याची चिन्हे आहेत.

त्याखेरीज आहे त्या प्रत्येक रेस्टॉरंटची एसएसजी वाढवण्यासाठीची मोहीम, त्या जोडीला नवी उत्पादनांचा विकास (एनपीडी- न्यू प्रॉडक्‍टस्‌ डेव्हलपमेंट) आणि ग्राहकांच्या गरजा डोळ्यासमोर ठेवून कंपनी कार्यरत आहे. कंपनीचे सध्याचे मॅकडिलिव्हरी, मॅककॅफे आणि मॅकब्रेकफास्ट या फ्लॅटफॉर्मना एकत्रित बळ देऊन काम करण्याचे धोरण आहे. सध्या ऑनलाइन फूड डिलिव्हरी कंपन्या अतिशय आक्रमकपणे काम करत असून घरी किंवा कामाच्या ठिकाणी खाद्यपदार्थ मागवून घेण्याचे ट्रेंड वेगाने वाढत आहे. हे लक्षात घेऊन सध्याच्या रेस्टॉरंटची संख्या तिपटीने वाढवण्याची संधी कंपनीला आहे.

सध्या करोनानंतरची परिस्थिती जवळपास पूर्वपदावर येत आहे, अर्थव्यवस्थेला उभारी मिळण्यासारखी परिस्थिती निर्माण झालेली आहे अशा वेळी नामांकित ब्रॅंड आणि अतिशय शिस्तबद्ध नियोजनानुसार काम करणाऱ्या कंपनीतील गुंतवणूक आगामी काही वर्षांमध्ये चांगला परतावा देऊ शकते.

शुक्रवारचा बंद – रु. 459.95
(राष्ट्रीय शेअर बाजार)
-सुहास यादव
suhaspyadav@gmail.com