तरूणांनी केली पक्ष्यांना `दाणा-पाणी`ची सोय; टाकाऊ डब्यांपासून बनवले “बर्ड फीडर”

वाल्हे – पुरंदर तालुक्यातील वाल्हे नजिक कामठवाडी येथील तरुणांनी टाकाऊ पासून टिकाऊ सूत्राचा वापर करत ‘पक्ष्यांसाठीचा फीडर’ बनवला आहे.  आता उन्हाळ्याला सुरूवात झाली असून, दिवसाचे कमाल तापमान वाढू लागले आहे.

येत्या काळात प्राण्यांसाठीचे नैसर्गिक पाणवठे, ओढे- नाले, बंधारे जवळपास आटलेच आहेत. त्यामुळे पक्ष्यांना अनेक ठिकाणाहून वणवण करावी लागते. नेमक्या अशाच वेळी वाल्हे (कामाठवडी) येथील ‘वृक्ष संवर्धन ग्रुप’ मधील तरुण कार्यकर्ते अमोल दुर्गाडे, महेश भुजबळ, सागर दुर्गाडे, आकाश जगताप, साहिल नेटके या युवकांनी पक्ष्यांसाठी पाणी आणि दाणे ठेवण्यासाठी थोडी आगळी वेगळी शक्कल लढवली आहे. ‘टाकाऊ पासून टिकाऊ’ या सूत्राप्रमाणे तेलाच्या मोकळ्या डब्यापासून पक्ष्यांसाठी पाणी आणि दाणे ठेवण्यासाठी या युवकांनी बर्ड फीडर बनवला आहे. हा बर्ड फीडर खाद्य तेलाच्या कॅन पासून बनवण्यात आला आहे.

वृक्ष संवर्धन या ग्रुपकडून, मागील काही वर्षांपासून, जिल्हा बँकेचे अध्यक्ष प्रा. डॉ. दिगंबर दुर्गाडे, तसेच ग्रामपंचायत वाल्हे यांच्या सहकार्यातून, तसेच हरितवारी उपक्रमांतर्गत आळंदी देवस्थान, सिने अभिनेते सयाजी शिंदे यांच्या देवराई संस्था, व बाणेर येथील वसुंधरा अभियान यांच्या माध्यमातून, वाल्हे येथील श्री संत ज्ञानेश्वर महाराज पालखी मैदान परिसरामध्ये अनेक वृक्ष लागवड करून, त्या वृक्षांचे योग्य संवर्धन या गृपच्या वतीने केले जात आहे.

श्रीमंत दगडूशेठ हलवाई ट्रस्टच्या माध्यमातून पाण्याचे दोन टँकर उपलब्ध करुन देण्यात आले आहेत, वाल्हे ग्रामपंचायत कर्मचारी, तसेच वृक्ष संवर्धन गृपचे सदस्य या टँकरच्या सह्याने पालखी मैदान परिसरामधील वृक्षांना पाणी देण्याचे काम करत आहेत. तसेच झाडे चांगल्या पद्धतीने वाढत असल्याने, वाल्हे येथील पालखी मैदान परिसरामधील झाडांवर पक्षी येण्यास सुरुवात झाली आहे. त्याच अनुषंगाने वृक्ष संवर्धनग्रुप मधील, अमोल दुर्गाडे व महेश भुजबळ, सागर दुर्गाडे, आकाश जगताप,साहिल नेटके या तरुणांनी पक्षांना चारा, पाणी उपलब्ध होवा या उद्देशातून ‘बर्ड फीडर’ बनवले असल्याचे या तरूणांनी सांगितले.

“आजच्या डिजीटल युगात सिमेंटची जंगले फोफावत आहेत. परिणामी पशु-पक्ष्यांचा निवारा संकटात आला आहे. वन्य जीवांच्या चारा-पाण्याची सोय करणे, पर्यावरण संतुलनासाठी अत्यंत गरजेचे आहे. वाढत्या सिमेंटच्या जंगलांनी निर्सगावर आक्रमण केल्याने गावशिवारे आणि झाडेही कमी होऊ लागली आहेत. वाढत चाललेले उन्हाचे चटके, निष्पर्ण होत असलेली झाडे, झुडुपे, दुर्मीळ होत असलेले पाणीसाठे यामुळे मुक्‍या वन्य प्राण्याना जगविण्यासाठी कसरत करावी लागत आहे; पहिल्या वर्षांत एका गावमधील २५ तरुणांनी जरी असा छोटासा प्रयत्न केला तरी, भविष्यात, पक्षांना चारा, पाणी मुबलक मिळण्यास मदत होईल”. – (अमोल दुर्गाडे, सागर दुर्गाडे वृक्ष संवर्धन ग्रृप वाल्हे, ता.पुरंदर, जि. पुणे.)

“पक्ष्यांसाठी घराबाहेर पाणी ठेवा’ असे संदेश सोशल मीडियावर फिरू लागतात. पण संदेश पाठविणाराच पक्ष्यांसाठी पाणी ठेवत नाही, ही शोकांतिका आहे. यामुळे पशु-पक्षी कमी होऊ लागले आहेत. प्रत्येकाने जबाबदारी ओळखून चारा पाण्याची सोय करणे गरजेचे आहे”. –  (महेश भुजबळ, वृक्ष संवर्धन ग्रृप वाल्हे. ता.पुरंदर, जि.पुणे)