पुणे | फोटो व्हायरल करण्याच्या धमकीप्रकरणी तरुणास अटक

पुणे, – तरुणीला रिलेशनशिप मध्ये राहा, अन्यथा दोघांचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल करण्याची धमकी देत मारहाण केल्याचा प्रकार घडला आहे. याप्रकरणी छत्रपती संभाजीनगर येथील एकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत वडगाव शेरी येथे राहणाऱ्या एका २६ वर्षीय तरुणीने येरवडा पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार आशिष धोंडीराम कोलते (३०, रा. क्रांतीनगर, छत्रपती शिवाजीनगर) असे गुन्हा दाखल करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. ही घटना ९ फेब्रुवारी रोजी सकाळी ८ च्या सुमारास शास्त्रीनगर येरवडा येथे घडली.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी आशिष कोलते आणि फिर्यादी या एकमेकांच्या ओळखीचे असून, त्यांच्या ओळखीचे रूपांतर प्रेमात झाले होते. दोघांनी एकमेकांसोबत फोटो काढले होते. त्यानंतर फिर्यादी शिक्षणासाठी पुण्यात आल्या होत्या. आरोपीने फिर्यादी यांना मोबाईल मधील फोटो दाखवून ‘जर तू माझ्या बरोबर रिलेशनमध्ये राहिली नाही, तर मी हे फोटो सोशल मीडियावर व्हरायल करेन, अशी धमकी दिली, तसेच दारू पिऊन शिवीगाळ आणि मारहाण केल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे.