पुणे | युवाशक्ती हे देशाचे मोठ बलस्थान

पुणे, {प्रभात वृत्तसेवा}- आज भारताकडे असणारी युवाशक्ती हे देशाचे सर्वांत मोठे बलस्थान आहे. त्यामुळेच अवघ्या जगाचे लक्ष भारताकडे लागलेले आहे. आपण सर्व काही करू शकतो, या भूमिकेतून आपल्या तरुणांनी आता संपत्तीचे निर्माते बनण्याची गरज आहे, असे प्रतिपादन राज्यपाल रमेश बैस यांनी केले. भारती विद्यापीठ अभिमत विश्वविद्यालयाच्या २५ व्या पदवी प्रदान समारंभाचे प्रमुख पाहुणे म्हणून ते बोलत होते.

कुलपती प्रा. डॉ. शिवाजीराव कदम यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या समारंभास कुलगुरू डॉ. विवेक सावजी, प्र-कुलगुरू डॉ. विश्वजीत कदम, परीक्षा विभागाचे नियंत्रक डॉ. अँथनी रोज, कुलसचिव जी. जयकुमार, सर्व विद्याशाखांचे अधिष्ठाता आणि व्यवस्थापन मंडळाचे सदस्य उपस्थित होते.

या वेळी ५ हजार ८५८ विद्यार्थ्यांना पदवी प्रदान करण्यात आली, तर ५६ विद्यार्थ्यांना पीएचडी प्रदान करण्यात आली. पदव्युत्तर आणि पदवी परीक्षांमध्ये सर्वोच्च गुण मिळवून उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना सुवर्णपदके आणि प्रमाणपत्र देऊन सन्मानित करण्यात आले.

आज रोजगाराच्या मोठ्या संधी निर्माण झाल्याने परदेशात जाऊन नोकऱ्यांचा शोध घेणाऱ्या तरुणांची संख्या कमी होते आहे. भारतात आयआयटीचे नवे कँपस उभे राहात आहेत. इतर देशांनाही आपल्याकडील शैक्षणिक ज्ञान हवे असल्याने तिथे आय़आयटी स्थापन करावे म्हणून सामंजस्य करार करण्यास अन्य देश इच्छुक आहेत, असे राज्यपाल रमेश बैस यांनी सांगितले.

तंत्रज्ञानात झपाट्याने होणारे क्रांतिकारी बदल, परदेशी विद्यापीठांशी असलेली स्पर्धा, अशा अनेक आव्हानांचा सामना करण्यासाठी भारती विद्यापीठ सज्ज आहे. जिद्द आणि महत्त्वाकांक्षेच्या बळावर डॉ. पतंगराव कदम यांनी भारती विद्यापीठाच्या प्रगतीचा आलेख कायम उंचावत ठेवला, असे डॉ. विवेक सावजी यांनी स्पष्ट केले आहे.