पिंपरी शहरात वाढताहेत आत्महत्या ! तरुणाईचे प्रमाण अधिक : एकूण शवविच्छेदनापैकी दहा टक्‍के आत्महत्या, सरासरी रोज एक आत्महत्या

 

पिंपरी, दि. 18 (प्रतिनिधी) – गेल्या एका आठवड्यात झालेल्या आत्महत्यांपैकी तीन आत्महत्या या खळबळ उडवून देणाऱ्या आहेत. त्यात 16 वर्षाच्या मुलीपासून ते 21 वर्षाच्या नवविवाहितेने आपले जीवन संपविले. दोन विद्यार्थिनी आणि एका विवाहितेने केलेल्या आत्महत्यांमुळे हा गंभीर प्रश्‍न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. शहरातील गेल्या दोन वर्षांचे आत्महत्यांचे आकडे पाहिले तर सरासरी रोज एक जण आपल्या हाताने आपले आयुष्य संपवित आहे.माणसासाठी त्याच्या जीवापेक्षा जास्त मौल्यवान गोष्ट या जगात नाही. असे असतानाही सध्याच्या काळात आत्महत्येच्या घटनांमध्ये होणारी वाढ ही चिंताजनक आहे.

पिंपरी चिंचवड शहरातही आत्महत्येच्या घटनांमध्ये दिवसेंदिवस वाढ होत आहे. त्यातही आत्महत्या करणाऱ्यांमध्ये तरुणांचे प्रमाण अधिक आहे. प्रत्येक आत्महत्येमागे कारण असले तरी आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी गुन्हे दाखल होण्याचे प्रमाण अत्यंत कमी आहे. प्रत्येक आत्महत्येमागे एक कारण दडलेले असते. कधी ते आत्महत्येपूर्वी लिहिलेल्या चिठ्ठीतून समोर येते तर कधी अगदी जवळच्या व्यक्‍तीला आत्महत्येचे कारण माहिती असते. मात्र प्रत्येकवेळी आत्महत्येचे कारण समाजासमोर येतेच, असे नाही.

पिंपरी चिंचवड शहरात होणाऱ्या आत्महत्येबाबत विचार केला तर यामध्ये तरुणांचे प्रमाण अधिक आहे. आत्महत्येची अनेक कारणे आहे. आत्महत्या करणाऱ्यांमध्ये महिलांचीही संख्या लक्षणीय असते. यामध्ये प्रेमात मिळालेला धोका, शैक्षणिक व करियरमध्ये आलेले अपयश, सासरकडील मंडळींकडून होणारा छळ असह्य झाल्यास किंवा इतरही कारणे आहेत. काही प्रकरणांमध्ये आर्थिक विवंचनेतून घरातील कर्ता पुरूष आत्महत्या करत असल्याच्या घटना घडल्या आहेत. अलिकडेच एका तरुणाने मैत्रिणीसमोर मारहाण व अपमान झाल्याने आत्महत्या केली. अशा अनेक कारणांमुळे तरुणाईला जीवन नकोसे वाटत असल्याचे धक्‍कादायक प्रकार उघडकीस येत आहेत.

आत्महत्येची प्रमुख कारणे
कौटुंबिक, आर्थिक समस्या
आजारपण, नैराश्‍य, बेरोजगारी
व्यवसनाधीनता, कर्जबाजारीपणा
वैवाहिक समस्या, प्रेमसंबंध
नजीकच्या व्यक्‍तीचा मृत्यू होणे
स्पर्धेच्या युगात अपयश
समाजात बदनामी झाल्याने

अशा रोखता येतील आत्महत्येच्या घटना
आत्महत्येची कारणे सहसा दिसून येत नाही. वरकरणी न दिसणारी अनेक कारणे या घटनांच्या तळाशी असतात. त्यांचा वेळीच शोध घेऊन ताण कमी केल्यास, आधार दिल्यास अशा घटना रोखता येतील.
एखादी व्यक्ती आत्ममग्न बनते, समाजापासून अलिप्त राहू लागते असे वर्तन करत असल्यास वेळीच सावध होऊन जवळच्या लोकांनी त्या व्यक्‍तीशी संवाद वाढविला पाहिजे.
आत्महत्येचा विचार मनात आला की, लगेच कोणी आत्महत्या करत नाही. अनेक दिवस तो आत्महत्येबाबत विचार करीत असतो. वर्तणुकीतील नैराश्‍य हेरून त्यास आधार देण्याचा प्रयत्न कुटुंबीयांकडून झाला पाहिजे.

20202021
शवविच्छेदन झालेल्यांची संख्या 3,7313,886
एकूण आत्महत्या330395
गळफास घेणे 180212
रेल्वेखाली जीव देणे 7092
विष प्राशन करणे 7880
नदीत उडी मारणे 28
जाळून घेणे–3