सातारा: जिल्हा परिषदेच्या सभा व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारेच होणार – उदय कबुले

करोनाच्या पार्श्वभूमीवर सतर्कता
सातारा :
सातारा जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात करोना विषाणूंचा प्रादुर्भाव वाढत असल्याने यापुढील काळात होणाऱ्या जिल्हा परिषद, पंचायत समितीच्या सर्व सभा व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे होतील, अशी माहिती जिल्हा परिषदेचे अध्यक्ष उदय कबुले यांनी दिली.

सातारा जिल्ह्यात सर्वच तालुक्यांमध्ये करोनाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात वाढला आहे.राज्याच्या सर्वच भागात अशी परिस्थिती असल्याने ग्रामविकास विभागाने परिपत्रक काढून सर्व प्रकारच्या सभा घेणे बंधनकारक केले. या सभा व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे घेण्याचे आदेश दिले होते.सातारा जिल्हा परिषद् प्रशासनानेही या आदेशाची पायमल्ली करण्याचा निर्णय घेतला होता. मात्र नुकत्याच झालेल्या स्थायी समिती सभेत काही सदस्यांनी या निर्णयाला विरोध करत पूर्वीप्रमाणे सभा घेण्याची मागणी केली होती. त्यामुळे सभा विडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे होणार की नाही असा प्रश्न निर्माण झाला होता.

राज्य शासनाने करोना परिस्थितीचा अभ्यास करून आणि संभाव्य धोका विचारात घेऊन व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे सभा घेण्याची केलेली सूचना योग्य आहे.या सूचनेनुसार सातारा जिल्हा परिषदेच्या सभा पुढील आदेश येईपर्यंत व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे घेण्यात येणार आहेत. दि. 9 सप्टेंबर रोजी होणारी जिल्हा परिषदेची सर्वसाधारण सभा व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे होणार आहे. संबंधित सदस्यांनी तालुक्याच्या ठिकाणी उपस्थित राहायचे आहे. सातारा मुख्य कार्यालयात येण्याची कोणीही तसदी घेऊ नये, असे आवाहनही कबुले यांनी केले आहे. याबाबत सर्व सदस्यांना पत्र पाठवून करोना संकट काळात सहकार्य करण्याचे आवाहन त्यांनी केले आहे.

Leave a Comment